Tuesday, June 9, 2020

बिरसा

बिरसा

बिरसा,
अजून घुसमटतोय श्वास
तुरुंगातल्या बंद दाराआड
तुझ्या उलगुलानच्या हाकेनं
जमलेल्या सगळ्यांचा.
तुझ्या उण्यापुऱ्या आयुष्यात 
तू पेटवलास वडवन्हाळ
आणि फुंकलेस प्राण 
तुझ्या तारप्यात.
आज तोच तारपा घेऊन
बाहेर पडताहेत ते सगळे
घुसमटलेल्या श्वासांचा
हिशोब मागायला.
मग तो देश आपला असो
की सातासमुद्रापल्याड
सत्ता परकियांची असो
वा आपल्याच लोकशाहीची.
तू लढलास बिरसा
त्या मत्त परकियांविरुध्द
आजही असंख्य लढताहेत 
उन्मत्त सत्ताधिशांच्या विरोधात निर्धारानं.
आज कोंडताहेत श्वास जे निष्ठूरतेनं
रंग आणि जाती धर्माच्या नावावर
आजही ते तसेच आहेत 
तेव्हासारखेच बेदरकार आणि मदमस्त.
तूझा कोंडलेला श्वास आठवतोय
तुझ्या तुरुंगाबाहेरच्या जमावाला
अजूनही तसाच जमतोय तो
तुझ्या हाकेसरशी जमला तेव्हा तसा.
आता जमतोय, येतोय एकत्र
देशादेशांच्या सीमा पार करुन
बिरसा, आहेस तू आमच्यातच
तुझ्या कोंडलेल्या श्वासासह.

सिरत सातपुते 
९ जून २०२०
बिरसा मुंडा स्मृतिदिन

3 comments:

  1. फारच छान कविता. 👌👍🌹

    ReplyDelete
  2. सिरत खूपच छान कविता तू इतक्या छान कविता करतेस मला माहिती नव्हतं

    ReplyDelete
  3. अप्रतिम! कविता

    ReplyDelete