Friday, August 28, 2020

प्रकाशबेटं

प्रकाशबेटं

या बाया कुठूनकुठून आलेल्या?
बायांचं हे चाललेय काय?
प्रश्न पडू लागलेत आता 
अनेकांना!!
देताहेत त्या नारा
निर्भय बनो चा
शाहिन बागेत दटून बसुन.
पुण्यातही बसल्या होत्या
रातच्या पारी, आणि
नागपाड्यातही.
जामियात, जेएनयुत पण
भळाळत्या जखमांसह 
ठाम उभ्या ठाकल्यात.
हे पाणी काही वेगळंच आहे,
व्यवस्थेची अस्पष्ट कुजबुज 
आणि दबकते इशारे.
दमनकारी यंत्रणा आणि 
सत्तेचा माज
नाही हलवू शकत 
तसुभरही या बायांना.
नाही शिरु देत या बाया
त्यांच्या विश्वात सहजासहजी
अनाहुतांना…
पण वेळ आली की
गांजलेल्या, पिचलेल्या या बाया
पेटून उठतात एका रात्रीत,
धाव घेतात आरेच्या जंगलात
आणि गेटवे ऑफ इंडियाला.
भेटतात या नजीबच्या आईला
समजून घेतात रोहितला 
सोबत राहतात एकमेकींबरोबर
डुब आल्यावर हातात हात धरुन.
माहुलच्या घरांतून बाहेर पडून
रस्त्यावर मांडतात संसार
आणि उध्वस्त न होता
लढतात, सावरतात एकमेकींना.
नाही म्हणायला शिकतात 
या बाया बेडरपणे,
इथेच जिंकतात या बाया
युगानयुगाचा संघर्ष
एका लिंगसत्ताकाशी चाललेला.
या निरंतर लढ्यात
सामिल आहेत काही बाप्येही
समतेच्या वाटेवर भेटलेत 
त्यांनाही जोतिबा न् गांधीबाबा.
केवळ बाप्यांच्या साथीने 
नाही सरशी होत या बायांची 
तर जिंकण्याचा कैफच 
चढत नाही बायांना.
त्या करत राहतात त्यांचं काम
अव्याहतपणे 
कसलीच तमा न बाळगता.
यालाच घाबरते व्यवस्था
आणि सुरू होतो 
एक सुडाचा प्रवास
जो घेऊन डुबणार असतो 
त्या व्यवस्थेच्या वाहकाला.
बाया उभ्या राहतात परतपरत
राखेतल्या फिनिक्ससारख्या,
बुडताना सगळं सावरतात
आणि वसवतात पुन्हा सगळं.
बुडवणं हा व्यवस्थेचा स्थायीभाव
आणि निर्मिती ही बायांची हातोटी.
आज बाहेर पडल्यात बाया
देश वाचवायला, नवनिर्मितीला.
आता वळून नाही बघणार 
या बाया 
थांबणार नाहित, 
जुमानणार पण नाहित 
फतवे आणि आदेशांना.
एक एक चिंगारी पेटलेय 
या बायांच्या मनामनात
मशालीत बदलल्यात या बाया
मशाल होऊन कारवाँ निघालाय
पेटवायला नाही तर प्रकाशवाटा उजळायला, 
स्वत: प्रकाशबेटं बनून...

सिरत सातपुते
२९ जानेवारी २०२०

Friday, August 14, 2020

स्वातंत्र्य दिनाच्या सदिच्छा

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
कोणी द्यायच्या कोणाला?
सत्तांध सरकारने, लाचार जनतेला?
का बुजूर्ग कार्यकर्त्याने 
आशावादी संवेदनशील तरुणांना?

आपण सर्वच हा दिवस मनवतोय 
आपापल्यापरिने
कोणी मध्यरात्री, कोणी सकाळी सकाळी,
नाच गाणी लाउडस्पिकरची रेलचेल
वर्षातला आजचा हा दिवस
राष्ट्रीय सण म्हणे
साजरा करायलाच हवा
गुलामिच्या बेड्या आवळताहेत 
तरिही.

लोकशाहिच्या या नगरीत 
गुंड झुंड पुंडाच्या राज्यात
कसा करावा विरोध
कशा मागाव्यात मागण्या
अटकाव कसा सत्तेला?
परिणाम नोटिसा आणि अटक अटळ.

कालपर्यंत फासाखाली गुदमरवत होता 
बळीराजा स्वतःला,
आज मरू दिलीत सहजतेने 
अजाण बालकांना!!! 
स्वातंत्र्यदिन साजरा झालाय
सर्वत्र हर्षोल्हासात, 
मदमस्तित दहिहंडी आणि
भक्तीरसात चिंब भिजलाय 
कृष्णजन्मोत्सव.
टाहो फोडताहेत देवकी
तुरूंग भरताहेत 
निषेधाचा सूर दडपला जातोय 
स्वतंत्रतेच्या जयघोषात!!

आपलीच माणसे आपल्याला 
गुलाम करताना बघून 
सांगा कसा साजरा करू 
हा काळवंडलेला स्वातंत्र्यदिन?
सांगा कशा देऊ सदिच्छा स्वातंत्र्यदिनाच्या?

सिरत सातपुते
१५ ऑगस्ट २०१७

Wednesday, August 5, 2020

कहर

कहर

कहर झालाय 
करोनाचा अन् पावसाचा
कडेलोट झालाय 
महानगराचा!
सुस्तावलेत सगळे
घेऊन  
अफुची गोळी
बडवले गेलेत नगारे 
जोरजोरात
आणि ओवाळल्यात
आरत्याही
नकोच ते
विकासाचे स्वप्न
जागेपणीच 
मिळाला आहे 
सगळ्यांना मोक्ष
कालचं एक दृश्य 
भरल्या घरात 
पावसाचं पाणी
भांबावलेल्या बायका
त्यातलीच एक
डोळे मिटून 
धावा करणारी
मदतीला आलाय तो?
आला असेल नक्कीच 
वानवा नाहीच 
या शहरात त्याची
फक्त तो राहात नाही देवळात 
की नाही बांधली जात 
त्याची देवळं!
हा एक चालतोय 
कधीपासून
हातात बूट आणि 
डोळ्यात अश्रु घेऊन
कुलुपबंदीत 
खायची भ्रांत
जगण्याची कसरत
तोही निराश हतबल
येईल त्याच्यासाठीही 
कोणीतरी
देईल आधार 
जगण्यासाठी
आणि मग
टेकू घेऊन चालायला लागेल 
सामिल व्हायला 
त्या टोळीत
टाळ वाजवत
मूर्ख बनत आणि बनवत!!

सिरत सातपुते
६ ऑगस्ट २०२०

Tuesday, July 28, 2020

कुलुपबंद शहर

कुलुपबंद शहर

त्या कुलुपबंद शहराने
एक खोलवर उसासा टाकला
आणि परत एकदा ते
चिडिचुप्प गल्लीबोळात 
जाऊन बसलं.
मध्यंतरी चर्चा होती शहरात
रात्रीच्या बेधुंदीची
रंगणार होती रात्रीची जिंदगी
आणि चढणार होती शहराला 
नवी जवानी.
पण आजकाल कसा काय
शहरात ऐकू येतोय 
हमरस्त्यावरचा फक्त सायरन
शववाहिका की रुग्णवाहिका
हेही आताशा कळत नाही
कारण गल्लीतले कुत्रे
कधीच विसरलेत रडणं
आणि माणसं तर 
दबकलेलीच.
रिकामे हात आणि 
रिकाम्या शाळा
सृजनाच्या वाटाच बंद करुन 
भकाळी पोट आणि 
कोरड्या डोळ्यांनी
आला दिवस कसाबसा जगत
गपगार पडलेली माणसं.
शांत तटस्थ माझं शहर
बघतय बंदीवासातली 
ही पडझड 
आणि माणसं उठतील,
मोट बांधतील 
उरल्या सुरल्या आकांक्षांची,
करतील धडपड
कधीना कधी सुरळीत जगण्याची
या एकाच आशेवर
बसलय ते कुलुपबंद होऊन!!

सिरत सातपुते
२८ जुलै २०२०

Sunday, July 12, 2020

चराचराचा उत्सव

चराचराचा उत्सव

आला वसंत घेऊन
नवी आशा मनात
पालवीत गात्र गात्र
सृजनाचे गीत गात

मोहरला आंबा, वड
कूजन पक्षांचे ऐकत
वृक्षवल्ली देती साथ
नवलाईचे उधळीत रंग.

वैशाख वणवा पेटला
जीवाची ती तगमग
शोधी सावलीचा आसरा 
अन् झुळूक सहारा.

रखरख दाटे जगी
आणि मनात कोरड
राप भाजणी, शाकारणी,
आगोटाची लगबग.

काडीकाडी जमवत
पाखराचं नवं घर
गर्क सर्व जगण्यात
आणि घरट्यात नवा जीव.

आला पाऊस पाऊस
झाडं न्हातीधुती झाली
शेंड्यावरल्या घरात
पिलं कुशीत हो शिरली.

भरवला चोचचारा
बळ पंखात भरले
घरट्यातून उडण्याचे
अलविदा क्षण आले.

सृष्टी पुकारे चोहून
टाक पाऊल बाहेर
पाऊस दावे रुद्ररुप
पडेल घरटं मोडून.

दुरून दुस-या झाडावर
पुकारती मायबाप
पाखराची धडपड
पंखात उसने बळ.

उड उड रे पाखरा
घेऊन नवोन्मेष
कर मृग हा साजरा
चराचराचा उत्सव!!!!

सिरत सातपुते
२५ जून २०१८


Thursday, July 2, 2020

सलाम, मुंबईकरा सलाम!




सलाम, मुंबईकरा सलाम!
सस्ती मौत मरणा-या मुंबईकरा सलाम!
अगतिक दरिद्री मुंबईकरा सलाम!
दररोज लाईफलाइनच्या गर्दीत घुसमटणा-या 
मुंबईकरा सलाम!
खड्ड्यातल्या रस्त्यात हाड मोडून घेणा-या 
मुंबईकरा सलाम!
सगळे कर निमूट भरणा-या 
मुकाट मुंबईकरा सलाम!
आर्थिक राजधानीनिवासी बिरुद मिरवणा-या 
मुंबईकरा सलाम!
बुलेट ट्रेनचे स्वागत करणा-या 
उदारमनाच्या मुंबईकरा सलाम!
मुर्दाड राजकारण्यांना परतपरत निवडून देणा-या 
मुंबईकरा सलाम!
कंबरभर पाण्यात तासनतास चालणा-या 
मुंबईकरा सलाम!
मुंबईचे स्पिरिट पिऊन पुन्हा सुळावर जायला तयार 
मुंबईकरा सलाम!
लोंबकळत, चेंगरत, घामेजत आयुष्य ढकलणा-या 
मुंबईकरा सलाम!
दरडीखाली, मॅनहोलमधे, ब्रीजवर, 
प्रत्येक ठिकाणी मरायला तयार मुंबईकरा सलाम!
सलाम मुंबईकरा, सलाम!
चाकरमान्या, तुझ्या सोशिकतेला सलाम!
रोजच कफन बांधून तयारीत जगणा-या 
मुंबईकरा, तुला मनापासून सलाम! सलाम!! सलाम!!!

सिरत सातपुते
३० सप्टेंबर २०१७

Monday, June 22, 2020

समर्पण

समर्पण

कोसळत्या पावसाच्या सरींसोबत
प्रियकराचा संदेश 
वाचत बसलेली ती
विसरुनच गेली 
त्या निरोप्याला
जो पाऊस होऊन 
गळून गेला 
निरोप देतादेता.

प्रितीच्या हिंदोळ्यावर झुलताना
भान हरपलेल्या तिने 
शोधलच नाही त्याला
नव्हताच तिला द्यायचा 
फेरनिरोप त्या यक्षाला
की नव्हती पाठवायची त्याला
ख्यालीखुशाली, खबरबात.

गुंग होती ती स्वप्नात
तिने लपेटलं होतं प्रेम 
सर्वांगाभोवती
निरोप्याने आणलेल्या
निरोपातलं.
अंतर्बाह्य ती चिंब
पावसात मग्न
प्रितीचे तुषार 
अंगावर झेलत.

दूर कुठेतरी मी तटस्थ
बघत उसासत होते
मेघदूताचं गळून संपणं
बघून हेलावत होते
आषाढस्य प्रथम दिवसे 
या समर्पणाची 
साक्षीदार होत होते.

सिरत सातपुते
२२ जून २०२०

Thursday, June 11, 2020

प्रियतम

प्रियतम

प्रियकर रुसूनी आग ओकता
मनवण्यास सज्ज चंचला, 
मेघदूत तो ओलांडे सागर
आगमनाचा घेऊन संदेशा.

घालमेल त्या क्लांत धरेची
प्रियतम पाऊस निमवत आला,
ढोल ताशे अन् रोषणाईसह
मृद् अत्तर उधळीत आला.

विरहिणी ही तप्त अवनी,
आसुसलेली प्राशी पाणी,
स्तब्ध चित्त ती लेकुरवाळी
शृंगारास्तव सिध्द जाहली.

अभिसारिका ती इंद्राची
उटणे, धूप न्हाउन आली,
विद्युल्लतेच्या तांडवासंगे
बेभान समर्पित झाली.

सृजनोत्सवाची सुरवात ही तर
नियम सृष्टीचा, जगरहाटीही
कारभारीण ही जग् नियंत्याची
मातृत्वास्तव सज्ज जाहली.

फुटता कोंब त्या ओटीमधूनी
घरट्यामधूनही चोची फुटती,
सचैल नाहली वृक्ष वल्लरी
तृप्त तृप्त चराचर जगती.

सिरत सातपुते
१० जून २०१९

Tuesday, June 9, 2020

बिरसा

बिरसा

बिरसा,
अजून घुसमटतोय श्वास
तुरुंगातल्या बंद दाराआड
तुझ्या उलगुलानच्या हाकेनं
जमलेल्या सगळ्यांचा.
तुझ्या उण्यापुऱ्या आयुष्यात 
तू पेटवलास वडवन्हाळ
आणि फुंकलेस प्राण 
तुझ्या तारप्यात.
आज तोच तारपा घेऊन
बाहेर पडताहेत ते सगळे
घुसमटलेल्या श्वासांचा
हिशोब मागायला.
मग तो देश आपला असो
की सातासमुद्रापल्याड
सत्ता परकियांची असो
वा आपल्याच लोकशाहीची.
तू लढलास बिरसा
त्या मत्त परकियांविरुध्द
आजही असंख्य लढताहेत 
उन्मत्त सत्ताधिशांच्या विरोधात निर्धारानं.
आज कोंडताहेत श्वास जे निष्ठूरतेनं
रंग आणि जाती धर्माच्या नावावर
आजही ते तसेच आहेत 
तेव्हासारखेच बेदरकार आणि मदमस्त.
तूझा कोंडलेला श्वास आठवतोय
तुझ्या तुरुंगाबाहेरच्या जमावाला
अजूनही तसाच जमतोय तो
तुझ्या हाकेसरशी जमला तेव्हा तसा.
आता जमतोय, येतोय एकत्र
देशादेशांच्या सीमा पार करुन
बिरसा, आहेस तू आमच्यातच
तुझ्या कोंडलेल्या श्वासासह.

सिरत सातपुते 
९ जून २०२०
बिरसा मुंडा स्मृतिदिन

Saturday, May 30, 2020

जथ्था बनून चालतेय...

जथ्था बनून चालतेय...

तो एक जथ्था
रस्ताभर चाललेला
बाई बाप्या मुलं
भूक तहान थकवा
सगळं एकवटलेला
एक एक पाऊल टाकणारा

त्या एका जथ्थ्याबरोबर
मागे पुढेही तसाच जथ्था
तोच तो सारखेपणा
तीच ती थीजलेली नजर
थकलेली तीच पावलं
आणि वेदनाही तीच ती

तोही एक त्यातलाच
नजरेसमोर फक्त 
घर आणि वावर
म्हातारा आणि म्हातारी
शेळी आणि कोंबडी
एकच आस त्यांना भेटण्याची

त्याच्यामागे तिचीही चाल
नजर तीच, तीच ओढ
खाली मान पण
काळजात ध्यास
सावरायचाय हिशोब
मांडायचाय नवा डाव

हरलेला तो, त्याच्यामागे तिचं लटांबर
कोवळ्या चालीची बकोटीला फरपट
हातातून सुटणारा थकलेला जीव
कडेवर तान्हा, रिकामा पान्हा
डोक्यावर किडुकमिडुक
सुकलेले डोळे आणि भकाळी पोट

नजरेपल्याड मुक्कामावर
त्याची तयारी, शेवटाची
तिची हिंमत, उभारायची
सावडायचय तिला जगणं
घरासाठी आणि त्याच्यासाठी
म्हणून जथ्था बनून चालतेय...
म्हणून जथ्था बनून चालतेय...

सिरत सातपुते
३० मे २०२०

Monday, May 25, 2020

मृत्यूचे गणराज्य

बा मृत्यो, तू येतोस
वेदनांचे कल्होळ घेऊन,
तू येतोस निर्दयीपणे
संचीतातून कठोरपणे नेतोस
तूला हवं असलेल्या कोणालाही,
हीच तुझी ओळख सर्वांसाठी.

तूझं येण जरी अपेक्षित 
स्वागत नाहीच तरीही
तूझं येण लांबवण्यातच
प्रयत्नांची पराकाष्ठा
आणि ते लांबवण यातच
इतिकर्तव्यता!!

कारण तू घालून ठेवलीस 
तुझी भिती मनामनात
आणि उलगडले नाहिस कधीही
तुझ्यानंतरचे विश्व,
नाही कधी बघीतली कोणी
ती आवर्त पोकळी
आणि तिथलं जीवन.

मी घाबरत नाही तुला
कारण मी ठरवलय स्पष्टपणे,
ते जग बघायचा विचार 
केव्हाच टाकलाय मागे
आणि चालू लागलेय त्या वाटेवर,
तू येणार आहेस ही भावना 
आताशा हावी नाही होत माझ्यावर.

मला आकळलय आता
तुझं अस्तित्व आणि 
तुझी अपरिहार्यता. 
म्हणूनच मैत्रीचा हात पुढे करुन 
सोबतीचा प्रस्ताव मांडलाय.

मी बोलत राहीन तुझ्याबरोबर,
अविरत चालत राहिन तु़झ्या सोबत
पण खबरदार असेन नक्कीच 
की तुझी माझी ही मैत्री
घाला नाही घालणार
माझ्या अस्तित्वावर, 
जे जपलय मी जीवापाड.

तुझं माझं मैत्र हे
अनाकलनिय, गूढ
तरिही शांतवणारं आणि
भेटीची ओढ लावणारं. 
तू भेटलास कधीकाळी
तर थांबेल काळ माझ्यासाठी
आणि स्मृतिशेष होऊन जाईल
माझं अस्तित्व.
आणि पुसून जातील माझ्या पाऊलखुणा.

मला चालणार आहे काळांचं
थबकणं आणि
वयाचा आकडा कॅलेंडरवर अडकणं.
मला चालणार आहे 
माझं स्वतःचं काळाबरोबर थांबण.
आणि म्हणूनच बा मृत्यो,
मी तयार आहे, 
माझं अस्तित्व स्मृतित अनुभवायला
माझ्या संचितातील 
एक वाटा तुला द्यायला.

सिरत सातपुते
११ नोव्हेंबर २०१९

Sunday, May 24, 2020

निरागस प्रेम

प्रिय जॅकी
जॅकी, आठवतोस तू मला बाबाच्या मागे स्कूटरवर बसून घरी आलेला! नव्या वर्षीच्या पहिल्या दिवशी सुरू झालेला तुझा आमच्याबरोबरचा प्रवास इतका पूर्णत्वाला नेणारा असेल असं तेव्हा अॅप्रनमध्ये गुंडाळलेल्या तुला बघून जरी वाटलं नसलं तरी माझ्यातल्या आईला तू नक्कीच साद घातली होतीस. तू घरात येईपर्यंत मांजरांपर्यंतच मर्यादित असलेल माझं प्रेम तुला वाढवताना सकल प्राणीमात्रांपर्यंत कसं पोहोचलं ते कळलच नाही.

तुला माझ्या स्वाधिन करुन बाबा गावाला गेला आणि तुला बोळ्याने दूध पाजणं ते तुला अलगद हाताने साफ करणं हे सर्व करताना परत एकदा आई झाल्याचा आनंद मिळत होता. तूही मला आई म्हणून आणि आपल्या सर्वांना आपलं म्हणून स्विकारलस. हे नातं तू कायम जपलस तुझ्या प्रेमानं. 

अनिकेत बरोबर कायम धाकट्या भावासारखा वागताना भांवडांतली असूया पण जपत आलास. त्याच्याकडून हक्कानं सगळी कामं करुन घेताना, खाऊत वाटा मागताना आणि त्याच्या चुगल्या करताना तूलाही खूप मजा यायची. दादाचे लाड केलेले तूला खपायचे नाहित आणि मग तू मला चिकटायला तरी यायचास किंवा मग रुसून कोप-यात तरी बसायचास. दादाचे सगळे मित्र तुझे मित्र होते आणि म्हणून आपण गावाला रहायला गेल्यावर तु़झ्या वाढदिवसाला सगळे मित्र खास मुंबईहून आले होते. एक जानेवारीला तू घरी आलास म्हणून दर एक जानेवारीला तुझा वाढदिवस आपण करायचो आणि एरव्ही हावरटपणा करणारा तू मस्तपैकी नवीन कपडे घालून दादाच्या हातात हात घालून केक कापायचास. नंतर ताव मारायचास ते असो. 

तसा तू खूपच समजूतदार! मी तुझ्याशी बोलताना एका विशिष्ट लाडिक भाषेत बोलायचे आणि तूला सगळं समजायचं. लोकांना कदाचित खरं नाही वाटणार पण तू सगळं ऐकायचास व त्याप्रमाणे वागायचासही. तूला घरात माणसं आलेली फार आवडायची आणि मग त्यांचा पाहूणचार करावा असा तुझा आग्रह असायचा. मी बोलत बसले तर थोड्या वेळाने चहा करण्यासाठी तू भुणभुण करायचास. पाहु़ण्यांना चहा पाणी खाऊ दिला की तू शांत व्हायचास आणि आपली जबाबदारी संपली असं समजून शांत झोपायचास. घरात आलेला माणूस बाहेर जायला निघाला की आम्ही तुला बाथरुममध्ये ठेवायचो नाहितर तू  त्यांना जाऊ द्यायचा नाहिस. हे तुझ्या इतकं अंगवळणी पडलं होतं की आपल्या मालतीताई घरी निघाल्या की तू स्वतःच बाथरुममधे जायचास!! 

दादा अभ्यासाला बसला की तू सोबत बसायचास आणि अभ्यासाऐवजी टाईमपास करतोय का बघायचास. मी दुपारी झोपल्यावर दादाबरोबर डब्यातले लाडू खाताना जराही आवाज करायचा नाही हे तुला कसं कळायचं तुलाच ठाऊक!! गावाला असताना तुझी आठवण आली की अचानक अपरात्री येणा-या दादाची चाहूल तुला कशी काय लागायची? एरव्ही रात्री अकरा वाजता आम्हाला झोपायला लावणारा व लगेचच घोरायला लागणारा तू कसा काय दादाने बेल मारायच्या आधीच दारात शेपटी हलवत उभा रहायचास?

दाराची बेल वाजवल्यावर तुला कसं रे कळायचं कोण आलय ते! ओळखीचं कु़णी आलं तर तुझ्या एकसदस्यीय स्वागत समितीतर्फे स्वागत करायला हजर राहायचं वा अनोळखी माणसाला आपल्या भरदार आवाजाने घाबरवून टाकायचं हे तुला बरोब्बर समजायचं. तुझ्या स्वागताने भारावलेली व्यक्ती मग तुझ्या प्रेमात कायमचीच पडायची तर तुझ्या आवाजाला घाबरलेली व्यक्ती चुकीचं काही करण्याच्या भानगडीत पण पडायची नाही. सोसायटीत राहणारी सगळी लोकं तुझ्या ओळखीची होती. नेहमी येणारी माणसं बिनधास्त येत असतं पण नवखं कुणीही सोसायटीत शिरलं की तू लगेच चारही बिल्डिंग्ज डोक्यावर घेणार!! फक्त आपलं घरच न राखता सगळी सोसायटी तू राखायचास. आणि म्हणून तू सगळ्यांचा लाडका पण होतास. आपण गावाला रहायला गेल्यावर गावाहून आल्यावर पहिले सगळेजण तुझीच चौकशी करायचे. अनिकेत मोठा झाल्यावर सगळी लहान मुलं मला जॅकीची मम्मी म्हणूनच ओळखायचे. मलाही अर्थात ते आवडायचं.

बाबाच्या पहिल्या आजारपणात तू कावराबावरा झाला होतास. नेहमी गावाला जाणारा बाबा तुला माहित होता पण हॉस्पिटलातून घरी आलेला बाबा तुला नवा होता. त्या दिवसांत तू बाबाच्या बरोबर घुटमळत राहायचास. बाबा झोपल्यावर मधेच आत जाऊन फेरी मारुन यायचास. त्याच्याबरोबर एरव्ही मस्ती करणारा, हट्ट करणारा तू त्याला एकटं सोडत नव्हतास. त्याचं आजारपण तुला कळलं होतं म्हणून नंतर काही वर्षांनी त्याच्यासाठी गावी जाण्याचा मी निर्णय घेतला तेव्हा तुला जीव की प्राण असलेल्या दादाला सोडून गावी आलास आणि तिथे रमवलस तू स्वतःला. मुंबईत उभं आयुष्य गेलेल्या मला तुझ्यामुळे गावात रुजायला मग वेळ लागला नाही.

गावात पण तू तुझ्या स्वभावानं सगळ्यांना जिंकून घेतलस. तुला बाहेर फिरवणारा रुपेशदादा तर तुझ्या एवढा प्रेमात पडला होता की तुला घेऊन गाव भटकताना तो दिवसभराचे श्रम विसरायचा. तुझ्या शाकाहारी असण्याचे कौतुक असलेल्या मालतीताई तुला आवडतो म्हणून शिरा करायला घ्यायच्या. आणि तू पण शिरा थंड होऊन तुला मिळेपर्यंत तिथेच बसून रहायचास. तसं तर तुला इडली, डोसा, ढोकळा, आंबोळ्या हे पदार्थपण आवडायचे पण विशेष प्रेम गोडावरंच. फ्रीजमधे आईसक्रिम, चायनाग्रास, पुडिंग असं काही असलं की तू रात्री जेवल्यावर फ्रिजच्या समोरच बसून राह्यचास. नुसते चमचे वाजले तरी आनंदाने शेपटी हलवायचास. तसा तू शुध्द शाकाहारी, दूधभात, दहिभात खाणारा. बहुतेकांना याचं आश्चर्यच वाटायचं पण मालतीताई तु़झ्या समोर मासे साफ करताना तू बसून बघायचास हेही एक आश्चर्यच वाटायचं बघणा-यांना.  

मला कधी बरं नसलं तर एरव्ही खादाड असणारा तू मी काही खाईपर्यंत माझ्या पायाशी झोपून रहायचास. अजिबात काहिही खायचा नाहिस, हे कसं काय तुला कळायचं रे? तुला घड्याळ बघायला येत होतं असा संशय येईल इतकी तुला अचूक वेळ समजायची. घरातल्या प्रत्येकाची जाण्या येण्याची वेळ तूला माहित असायची. आणि ती वेळ झाली की तू जा आता, वेळ झाली असं सांगत भंडावून सोडायचास. रात्री सुध्दा जेवणाची वेळ, झोपायची वेळ तुला बरोब्बर कळायची आणि त्या वेळा तू आम्हाला पाळायला लावायचास. तुला गच्चीवर जायला खूप आवडायचं. दादाने एक वेळ कबुल केली असली की तोपर्यंत तू आम्हाला गप्पा मारू द्यायचास, वेळ झाली की भुणभुण सुरू. 

तसां तू घाबरटच!! लहानपणी कधीतरी सिलेंडरला घाबरलेला तू नंतर आयुष्यभर सिलेंडर फोबिया घेऊनच जगलास. सिलेंडरची गाडी आली रे आली की तुझी शेपटी दोन पायांत गेलीच म्हणून समजा. नेमकी आपल्या खिडकीबाहेर गाडी उभी असायची आणि सगळ्या कॉलनीला सिलेंडर देईपर्यंत तू भीतीने भुंकून भुंकून बेजार झालेला असायचास. आपल्या घरी ज्या दिवशी सिलेंडर यायचं त्यादिवशी प्रत्येकाला घरी आल्यावर तू घाबरुन दाखवायचास. फटाक्यांची भीती तर तुला इतकी वाटायची की दिवाळी आणि गणपती, देवी विसर्जनाच्या वेळी मी तुझ्या कानाला बाळंतिणीसारखं फडकं बांधायचे आणि तू एका कोपऱ्यात थरथरत बसलेला असायचास. एरव्हीही बाहेरच्या कुत्र्या मांजरांबरोबर तू कधी पंगा घ्यायचा नाहिस, तुझ्या अंगावर कुणी आलं तर तू दुर्लक्ष करायचास, मग दादाच दादागिरी करायचा. तू शांतपणे घरी यायचास.

बाबाच्या शेवटच्या आजारपणात तू मुंबईला दादाबरोबर होतास. नंतर जरी तू माझ्याबरोबर गावाला राहिलास तरी तू बाबाला मुंबईत शोधत होतास. जवळ जवळ वर्षभर आपण दोघं गावाला असताना तू माझ्याबरोबर माझा आधार बनुन राहिलास. पण परत मुंबईला आल्यावर लगेचच आठ दिवसांत कसा काय तू आजारी पडलास? नंतर अकरा महिने तू आजारीच होतास. या तुझ्या आजारपणात तू शहाण्या मुलासारखं औषध उपचार करुन घेतलेस. एरव्ही मोठ्या मिनतवारीने औषधं घेणारा तू सकाळी फिरुन आल्यावर हातपाय धुवून घेऊन उपाशीपोटीची थायरॉईडची गोळी खायला फ्रीजजवळ उभा रहायचास. कुठून आलं होतं हे शहाणपण? मोठ्या विश्वासाने आम्ही नेऊ त्या डॉक्टरकडे यायचास. एवढा त्रास होत असूनसुध्दा आम्हाला बरं वाटेल असा वागायचास. 

शेवटचा महिना तर तुझ्यासाठी खूपच वाईट गेला. पण आमच्या सोबत तू सगळं सहन केलस. या दिवसांत दादा तुझा आईबाबा झाला होता. तू त्याच्याकडून सगळं करुन घ्यायचास. रात्री झोपताना त्याच्याच हातावर डोकं टेकून झोपायचास. तू उपचारांना प्रतिसाद देत नव्हतास पण तुला आम्हाला सोडूनही जाववत नव्हतं. उणापुरा चौदा वर्षांचा सहवास होता आपला. तू आलास आणि आपलं कुटुंब पूर्णत्वाला आलं होत. तुझा बाबा आधीच हे सहजीवन सोडून गेला होता आणि आता तू पण मला आणि दादाला सोडून निघाला होतास. मूकपणे आमची संमती घेतलीस आणि दिगंताच्या प्रवासाला शांतपणे निघालास. आज तुला जाऊन तीन वर्ष झाली तरी तूझं माझ्या आसपास घुटमळणं जाणवत राहतं आणि मग मी आठवत रहाते तुला, तुझ्या निरागस प्रेमाला!! 
तुझी आई
१९ मार्च २०१९

सिरत सातपुते

Saturday, May 23, 2020

मुक्त ती

मुक्त ती

काटेसावर फुलतेय...
निष्पर्ण होतेय
काटेरी दिसतेय
तरी कशी फुलतेय?

जगण्याची असोशी
अंगाखांद्यावर खेळवतेय?

ती पण एक मादीच
जन्मायचं, वाढायचं
ओरबाडून घेऊन
निष्पर्ण व्हायचं.
काटे फिस्कारुन
काटेरी व्हायच.
तळपत्या उन्हात
तापतं राहायचं.
सावलीलाही
जवळ नाही करायचं.
पण मग फुलतेस कशी?

म्हणजे?

मादीत असतच ना
मातृत्व!
तिलाही असतेच ना ओढ
सृजनाची.
तिलाही फुटतोच पान्हा
आणि तीही जनते 
पोटचा गोळा.

जगताना उरीपोटी
काट्यांनी रक्तबंबाळ ती,
भर उन्हात प्रसवते
लालचुटुक रंग.

सांगते नातं थेट
त्या आग ओकणाऱ्या सूर्याशी.

समिधा होऊन जळत राहते
लाल फुलांना जपत राहते.
कारण तिला माहित आहे
या फुलांतूनच उडणार आहे
तिचं अनाहत मन
सरकीच्या रुपानं.

ते होणार आहे 
वाऱ्यावर स्वार
आणि निघणार आहे
अनंताच्या प्रवासाला
मुक्तपणे.

सरत्या उन्हाळ्यात
तिचं मादीपण
परत अडकेल चक्रात
होत राहिल ती 
रत्तबंबाळ पदोपदी
पण तिच्या मनावर
हावी नाही होणार कुणी
कारण
लखलखत्या उन्हात
मुक्तीच्या दारात 
पुन्हा पुन्हा 
फुलेल ती!!

सिरत सातपुते
६ मार्च २०२०

Friday, May 22, 2020

वसुंधरेचं पत्र

बाळा, तसा तुझा जन्म उशीराचाच
तुझ्याआधीही होते मी सृजन संपन्न
भरल्या घरात नांदत्या गोकुळात
बुध्दी आणि  गुणसंपन्न  तू
अलगद माझ्या पोटी आलास.

वाटलं होतं तूझ्या जन्मानंतर
तू शिकशील जगरहाटी
भावंडांवर प्रेम करशील
आणि तुझ्या बलदंड बाहुंवर
मला तोलून धरशील.

तसं सुरवातीला बरं चाललं तुझं
तू रमलास भवतालात
दऱ्याखोऱ्यांत स्वच्छंदपणे
जगू लागलास सहजपणे
तुझ्या जगण्यात मला सुखावत.

जोवर तू होतास नर आणि मादी
तू सृजनातला एक भाग होतास
तोवर बरं चाललेल तुझं
आणि अचानक जागी झाली
जगण्यातली तुझी ती तृष्णा!

पडू लागले प्रश्न तुला
आणि झालास तू सैरभैर
तू शोधत होतास उत्तरं
आणि मिळवत गेलास ती
तू लावलेल्या प्रत्येक शोधासरशी.

तूझी दमछाक होताना पहात होते मी
पण तू होतास शोधाच्या मस्तीत
सुखावत होते मी तुझ्या आनंदात
तुझे बलदंड बाहु खुणावत होते मला
विसावणार होते मी तृप्तीत.

पण मग मला दिसली तुझ्या डोळ्यात
ती हिंस्त्र मृगतृष्णा
आपल्याच सहचरांचा घास घेणारी
शिडीचा उपयोग करुन
तिला फेकून देणारी.

तू चालत होतास अथकपणे
काबीज करत होतास 
नवनवीन शिखरे
तू काढत होतास वाट
आपल्याच सहोदरांचा गळा घोटून.

भ्यायले, थरकापले, गुदमरले मी
तुला थांबवले, रागावले, चिडले
तू आपला ठिम्म, उन्मत्त
कठोरपणे चालूच ठेवलस
जन्मदात्रीला ओरबाडणं.

जखमी रक्तबंबाळ मी
हिशोब अासवांचा करत होते
पापाचा घडा भरलाय म्हणत 
वठणीवर आणू पहात होते
मातृह्रदयाने तळमळत होते.

सुक्ष्म जीव तो करोनाचा
चिंतीत होऊन विचार केला
जगाला आणि मला वाचवायला
स्वतःहून पुढे आला
स्वतः खलनायक झाला.

सहचर आणि सहोदरांच्या
वाट्याला तो नाही गेला
पृथ्वीतलावर हाहाकार माजवला
माणसा तुला हतबल केला
बुध्दीचा अहंकार पायतळी आणला.

तुझ्याच अतिरेकामुळे
हा दिवस तुला दिसला
मीही एक जीव साधा
असंच जर मानलस मानवा
तरच सुटेल हा विळखा.

पड बाहेर यातून प्रयत्ने
अन् वाचव पुढच्या पिढ्यांना
परतुनी ये निसर्गाकडे
कवेत घे ही सृष्टी आनंदे
हाच उपाय आता उरला.

उन्मत्त परि राहिलास अजूनी
नामशेष होशील निमिषार्धी
करोना ही तर झलकच याची
खूणगाठ ही बांध मनाशी
धमकी नाही ही तर वस्तुस्थिती.

वसुंधरा मी जननी तुझी
देते तुला हा आर्त इशारा
ये सोबत माझ्या आज लेकरा
चल वसवुया नव्या जगता
बहरवुया तुझ्याच वंशवेला.

सिरत सातपुते
२२ एप्रिल २०२०

आज आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस!!
गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे निसर्गात असणारी जैविक साखळी विस्कळीत होतेय. या विस्कळीत झालेल्या साखळीमुळेच कोरोनासारखे संकट जगावर आले आहे. आपण मानव प्राणी या संकटाला कारणीभूत आहोत. वसुंधरेवरची जैवविविधता टिकवण्याची जबाबदारी खरं म्हणजे या जैवविविधतेचाच भाग असलेल्या बुध्दीमान अशा मानव प्राण्याची होती. पण याच माणसाने स्वतःच्या हव्यासापोटी ही जैवविविधता धोक्यात आणली आहे. आज करोनाच्या पार्श्वभूमीवर वसुंधरेचं पत्र म्हणूनच महत्वाचं आहे. या पत्रातून काय इशारा देतेय वसुंधरा माणसाला? वाचुया वसुंधरेचं पत्र या माझ्या कवितेत, `लेखणीतून...´ या ब्लॉगवर. वसुंधरादिनानिमित्त लिहिलेली ही कविता आजच्या जैवविविधता दिनाच्या निमित्ताने प्रकाशित करत आहे.
सिरत सातपुते
२२ मे २०२०






























Thursday, May 21, 2020

निष्पर्ण बहावा, पोपट आणि सक्तीचा विजनवास

निष्पर्ण बहावा, पोपट आणि सक्तीचा विजनवास

आम्हा रिजन्सी वासियांचा सक्तीचा विजनवास सध्या चालू आहे. आम्ही सर्व घरात कडेकोट बंद आणि बाहेर निसर्ग आपल्याच धुंदीत मस्त. महिनाही झाला नाही रिजन्सीत रहायला आल्याला. मुंबईतील सरस्वती बाग सारख्या वाळवंटातील ओअॅसिसमधुन अचानक रिजन्सीसारख्या काँक्रीटच्या जंगलात रहायला आल्यावर मन थोडं खट्टु झालं होतं. खिडकीतून बाहेर बघीतल्यावर माणसं दिसत होती, घरं दिसत होती पण काहीतरी हरवल्यासारख सतत जाणवत होतं.

आणि आज सकाळी युरेका युरेका असं मला ते सापडलं. माझ्या बाल्कनीतून एक सुंदर बहावा दिसतोय हा शोध मला लागला सकाळी सकाळी. मग काय कॉफी पिता पिता बहावा नजरेसमोरुन हलूच देत नव्हता. गुंतलेच मी त्या सोनेरी सौंदर्यात. अनिमिष नजरेने ते सौंदर्य पीत असताना अचानक नजर झाडाच्या शेंड्याकडे गेली आणि थबकलेच मी! 

निष्पर्ण बहाव्यावर नुकताच फुलोरा आलाय. अजून झाडं फुलांनी बहरायचय. झाडाचा बहुतांश भाग हा निष्पर्ण उदास आहे. अशा त्या उदास टोकावर एक पोपट शांतपणे बसला होता. आजूबाजूच्या अशोकाच्या झाडांवर पोपटांचा लपंडाव रंगला होता. मधुनच साळुंक्यांची बडबड चालू होती. माणसांमध्ये राहण्याचा जन्मसिध्द हक्क असलेले कावळे आणि कबुतरं पोपट आणि साळुंक्यांना हुसकावं का या विचारात इथेतिथे उगाचच उडत होती. बहाव्याच्या घोसांवर झोका घ्यायला चिमण्यांची लगबग सुरू झाली होती आणि या सगळ्यांपासून दूर निष्पर्ण टोकावर एक पोपट ध्यानस्त बसला होता. हो, त्यालाच बघुन थबकले होते मी!! 

कधीतरी शाळेत शिकलेली कवितेची ओळ आठवली, शुकासारखे वैराग्य ज्याचे... आणि खरंचं वैराग्य काय असते हे त्या एकट्या बसलेल्या पोपटाकडे बघुन जाणवायला लागले. सकाळच्या पारी निसर्गातली मुक्त उधळण बघत बसलेली मी कुठेतरी दूरदूर जातेय असं वाटायला लागलं आणि मी फुलत्या बहाव्याच्या सौंदर्यातून, पक्षांच्या बागडण्यातून, नैसर्गिक आवाजांतून मुक्त व्हायला लागले. 

मन निरव शांतता अनुभवत होतं आणि अचानक सांगितिक कोलाहलाने माझी तंद्री भंगली आणि मी परत वास्तवात आले. समोरच्या इमारतीत मोठ्या आवाजात गाणं लागलं होतं आणि मला वास्तवाचं भान आलं. करोनाचं ग्रहण आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग असे सगळे विचार मनावर हावी व्हायला लागले आणि क्षणिक वैराग्यात अडकलेली मुक्त झाले मी अजून खूप काम बाकी आहे या भावनेतून. बहाव्याचं सौंदर्य परत खुणावायला लागलय आणि बाहेरच बोचरं वास्तवही टोचायला लागलय. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही असा शब्द त्या निष्पर्ण बहाव्यावरील वैरागी शुकाला देत परत कामाला लागण्यासाठी उठले.

सिरत सातपुते
४ एप्रिल २०२०

Wednesday, May 20, 2020

माझा जीवलग सखा

माझा जीवलग सखा

सूर्यास्त मला नेहमीच खुणावत आलाय. जेव्हा जेव्हा जिथे कुठे सूर्यास्त बघायला मिळाला की मी भान हरपून सूर्यास्त बघत राहते. आजही तसच काहिसं झालं. नेहमीसारखी संध्याकाळी खिडक्या लावायला म्हणून गेले आणि आभाळात सूर्याबरोबरच ढगांचही दर्शन झालं. आजचा सूर्यास्त काहीसा वेगळा आहे असं मनात म्हणेपर्यंत तो अलविदा करायला लागला. आणि मी अनिमिष नजरेनं त्याच्याकडे बघतच राहिले. आभाळात ढगांच्या पखरणीत, घराकडे निघालेल्या पक्षांबरोबर न रेंगाळता हा झपाझप निघाला सुध्दा!! चटकन फोन हातात घेतला आणि पटापट फोटो काढले. मुंबईतल्या गर्दीत हिरवळ टिकून असलेल्या जोगेश्वरीतल्या माझ्या कॉलनीतल्या एका बिल्डींगमागे अस्ताला जाताना आजच्या या सूर्याने नकळत मला माझ्या बालपणात नेलं. 

माझं बालपण पण जोगेश्वरीतच गेलंय. शाळेच्या सुट्टीच्या दिवशी माझी हमखास गच्चीवारी असायची. आमची इमारत आणि आजूबाजूच्या सर्वच इमारती दोन मजल्यांच्या असल्याने सूर्यास्त अगदी डोळा़भरुन पाहता यायचा, मधे कसलाच अडथळा नसायचा. ब-याच वेळेला मी एकटीच गच्चीवर काय करते याचं कुतुहल मैत्रिणींना असायचं. मी मात्र जमेल तेव्हा संध्याकाळ सूर्यास्त बघण्यातच घालवायचे. 

कधीतरी घरातल्यांबरोबर जुहू चौपाटीला गेले की माझी अवस्था कधी एकदा सूर्यास्त होतोय अशी व्हायची. समुद्र, लाटा, पाणी, किनारा या कशाकशाचे भान राहायचे नाही आणि मी तो तांबडालाल गोळा क्षितीजापार जाताना बघतच राहायचे. कॉलेजला गेल्यावर दादर चौपाटीपण अशीच खुणावायची. या चौपाटीवर मावळतीला जाणा-या सूर्याच्या साक्षीनं जोडीदाराबरोबर सहजीवनाची स्वप्न देखील बघीतली. एकदा असंच चिपळूणला छात्रभारतीच्या अधिवेशनाला गेले होते, येताना आम्ही सर्वजण गणपतीपुळ्याला गेलो. नेमकं संध्याकाळी पोहोचलो किना-यावर तर तो गणपतीपुळ्याचा अथांग समुद्र तांबडंलाल सूर्यबिंब पोटात घेत होता. मुंबईच्या किना-यावरुन बघितलेला सूर्यास्त आणि या सूर्यास्तात जबर फरक होता. त्यानंतर कधी मुंबईत चौपाटीवर सूर्यास्त बघावासाच वाटला नाही.

नंतर ब-याच वर्षांनी मालवणच्या समुद्रातला सूर्य असाच भरतीच्या लाटांवर नर्तन करताना दिसला. नाथ पै सेवांगणचा शांत किनारा आणि भरतीच्या लाटांवर नाचत नाचत अस्ताला जाणारा सूर्य, मग ब्रम्हानंदी टाळी लागली तर काय नवल!! 

गोव्यातला सूर्यास्त रोज एकाच जागेवरुन बघीतला तरी रोजच वेगवेगळा कसा दिसतो हे कोडे मला अजूनही सुटलेले नाही. आपल्याच तालात किना-यावरील मायावी जगापासून दूरदूर जाताना हा अस्ताला जाणारा सूर्य सतत सोबतीला असण्याचा आनंद आजही तितकाच उत्कटतेने मनात जागा आहे. 

परवा माझी मैत्रीण मला म्हणालीपण आजकाल समुद खूपच आवडतोय वाटतं! मी हसले फक्त, तिला सांगायचं राहिलच की समुद्रापेक्षा तो सूर्यास्तच जास्त आवडतोय. दमणला तिच्या घरातून समुद्र दिसतो पण सूर्यास्त बघायला किनाराच गाठायला हवा. 

हे सूर्यास्ताचं आणि माझं नातं मलाच आता उलगडायला लागलं आहे आणि म्हणूनच मध्यंतरी राजस्थानला गेले तर जैसलमेरला पोहोचता पोहोचता सूर्य अस्ताला जाता जाता रस्त्यावर आमच्या समोर उतरुन आलेला बघीतला आणि वेडच लागायचे बाकी राहिले. इतका सुंदर मावळतीचा सूर्य बघीतल्यावर साहजिकच वाळवंटातील सूर्यास्त बघायची ओढ लागली. मस्त जामानिमा करुन या माझ्या जीवलगाला वाळवंटात भेटायला उंटाच्या गाडीतून गेले तर हा पठ्ठा ढगांच्या आडून माझी मजा बघतोय. ठिम्म आलाच नाही बाहेर शेवटपर्यंत. आता फक्त त्याला भेटायला म्हणून परत वाळवंटात जावं लागणार तर!! 

आयुष्याच्या ह्या टप्प्यावर माझा हा सखा मला भेटतच राहतोय वेगळ्यावेगळ्या जागी. मीहि मग झुगारून देते सगळी बंधनं आणि भेटते त्याला मनापासून. काहूर माजलेलं माझं मन शांतावतं त्याला भेटून. ही भेट अशीच चालू राहिल अव्याहत माझ्यापुरत्या सृष्टीच्या अंतापर्यंत हे निश्चित.

सिरत सातपुते