Friday, August 28, 2020

प्रकाशबेटं

प्रकाशबेटं

या बाया कुठूनकुठून आलेल्या?
बायांचं हे चाललेय काय?
प्रश्न पडू लागलेत आता 
अनेकांना!!
देताहेत त्या नारा
निर्भय बनो चा
शाहिन बागेत दटून बसुन.
पुण्यातही बसल्या होत्या
रातच्या पारी, आणि
नागपाड्यातही.
जामियात, जेएनयुत पण
भळाळत्या जखमांसह 
ठाम उभ्या ठाकल्यात.
हे पाणी काही वेगळंच आहे,
व्यवस्थेची अस्पष्ट कुजबुज 
आणि दबकते इशारे.
दमनकारी यंत्रणा आणि 
सत्तेचा माज
नाही हलवू शकत 
तसुभरही या बायांना.
नाही शिरु देत या बाया
त्यांच्या विश्वात सहजासहजी
अनाहुतांना…
पण वेळ आली की
गांजलेल्या, पिचलेल्या या बाया
पेटून उठतात एका रात्रीत,
धाव घेतात आरेच्या जंगलात
आणि गेटवे ऑफ इंडियाला.
भेटतात या नजीबच्या आईला
समजून घेतात रोहितला 
सोबत राहतात एकमेकींबरोबर
डुब आल्यावर हातात हात धरुन.
माहुलच्या घरांतून बाहेर पडून
रस्त्यावर मांडतात संसार
आणि उध्वस्त न होता
लढतात, सावरतात एकमेकींना.
नाही म्हणायला शिकतात 
या बाया बेडरपणे,
इथेच जिंकतात या बाया
युगानयुगाचा संघर्ष
एका लिंगसत्ताकाशी चाललेला.
या निरंतर लढ्यात
सामिल आहेत काही बाप्येही
समतेच्या वाटेवर भेटलेत 
त्यांनाही जोतिबा न् गांधीबाबा.
केवळ बाप्यांच्या साथीने 
नाही सरशी होत या बायांची 
तर जिंकण्याचा कैफच 
चढत नाही बायांना.
त्या करत राहतात त्यांचं काम
अव्याहतपणे 
कसलीच तमा न बाळगता.
यालाच घाबरते व्यवस्था
आणि सुरू होतो 
एक सुडाचा प्रवास
जो घेऊन डुबणार असतो 
त्या व्यवस्थेच्या वाहकाला.
बाया उभ्या राहतात परतपरत
राखेतल्या फिनिक्ससारख्या,
बुडताना सगळं सावरतात
आणि वसवतात पुन्हा सगळं.
बुडवणं हा व्यवस्थेचा स्थायीभाव
आणि निर्मिती ही बायांची हातोटी.
आज बाहेर पडल्यात बाया
देश वाचवायला, नवनिर्मितीला.
आता वळून नाही बघणार 
या बाया 
थांबणार नाहित, 
जुमानणार पण नाहित 
फतवे आणि आदेशांना.
एक एक चिंगारी पेटलेय 
या बायांच्या मनामनात
मशालीत बदलल्यात या बाया
मशाल होऊन कारवाँ निघालाय
पेटवायला नाही तर प्रकाशवाटा उजळायला, 
स्वत: प्रकाशबेटं बनून...

सिरत सातपुते
२९ जानेवारी २०२०

Friday, August 14, 2020

स्वातंत्र्य दिनाच्या सदिच्छा

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
कोणी द्यायच्या कोणाला?
सत्तांध सरकारने, लाचार जनतेला?
का बुजूर्ग कार्यकर्त्याने 
आशावादी संवेदनशील तरुणांना?

आपण सर्वच हा दिवस मनवतोय 
आपापल्यापरिने
कोणी मध्यरात्री, कोणी सकाळी सकाळी,
नाच गाणी लाउडस्पिकरची रेलचेल
वर्षातला आजचा हा दिवस
राष्ट्रीय सण म्हणे
साजरा करायलाच हवा
गुलामिच्या बेड्या आवळताहेत 
तरिही.

लोकशाहिच्या या नगरीत 
गुंड झुंड पुंडाच्या राज्यात
कसा करावा विरोध
कशा मागाव्यात मागण्या
अटकाव कसा सत्तेला?
परिणाम नोटिसा आणि अटक अटळ.

कालपर्यंत फासाखाली गुदमरवत होता 
बळीराजा स्वतःला,
आज मरू दिलीत सहजतेने 
अजाण बालकांना!!! 
स्वातंत्र्यदिन साजरा झालाय
सर्वत्र हर्षोल्हासात, 
मदमस्तित दहिहंडी आणि
भक्तीरसात चिंब भिजलाय 
कृष्णजन्मोत्सव.
टाहो फोडताहेत देवकी
तुरूंग भरताहेत 
निषेधाचा सूर दडपला जातोय 
स्वतंत्रतेच्या जयघोषात!!

आपलीच माणसे आपल्याला 
गुलाम करताना बघून 
सांगा कसा साजरा करू 
हा काळवंडलेला स्वातंत्र्यदिन?
सांगा कशा देऊ सदिच्छा स्वातंत्र्यदिनाच्या?

सिरत सातपुते
१५ ऑगस्ट २०१७

Wednesday, August 5, 2020

कहर

कहर

कहर झालाय 
करोनाचा अन् पावसाचा
कडेलोट झालाय 
महानगराचा!
सुस्तावलेत सगळे
घेऊन  
अफुची गोळी
बडवले गेलेत नगारे 
जोरजोरात
आणि ओवाळल्यात
आरत्याही
नकोच ते
विकासाचे स्वप्न
जागेपणीच 
मिळाला आहे 
सगळ्यांना मोक्ष
कालचं एक दृश्य 
भरल्या घरात 
पावसाचं पाणी
भांबावलेल्या बायका
त्यातलीच एक
डोळे मिटून 
धावा करणारी
मदतीला आलाय तो?
आला असेल नक्कीच 
वानवा नाहीच 
या शहरात त्याची
फक्त तो राहात नाही देवळात 
की नाही बांधली जात 
त्याची देवळं!
हा एक चालतोय 
कधीपासून
हातात बूट आणि 
डोळ्यात अश्रु घेऊन
कुलुपबंदीत 
खायची भ्रांत
जगण्याची कसरत
तोही निराश हतबल
येईल त्याच्यासाठीही 
कोणीतरी
देईल आधार 
जगण्यासाठी
आणि मग
टेकू घेऊन चालायला लागेल 
सामिल व्हायला 
त्या टोळीत
टाळ वाजवत
मूर्ख बनत आणि बनवत!!

सिरत सातपुते
६ ऑगस्ट २०२०

Tuesday, July 28, 2020

कुलुपबंद शहर

कुलुपबंद शहर

त्या कुलुपबंद शहराने
एक खोलवर उसासा टाकला
आणि परत एकदा ते
चिडिचुप्प गल्लीबोळात 
जाऊन बसलं.
मध्यंतरी चर्चा होती शहरात
रात्रीच्या बेधुंदीची
रंगणार होती रात्रीची जिंदगी
आणि चढणार होती शहराला 
नवी जवानी.
पण आजकाल कसा काय
शहरात ऐकू येतोय 
हमरस्त्यावरचा फक्त सायरन
शववाहिका की रुग्णवाहिका
हेही आताशा कळत नाही
कारण गल्लीतले कुत्रे
कधीच विसरलेत रडणं
आणि माणसं तर 
दबकलेलीच.
रिकामे हात आणि 
रिकाम्या शाळा
सृजनाच्या वाटाच बंद करुन 
भकाळी पोट आणि 
कोरड्या डोळ्यांनी
आला दिवस कसाबसा जगत
गपगार पडलेली माणसं.
शांत तटस्थ माझं शहर
बघतय बंदीवासातली 
ही पडझड 
आणि माणसं उठतील,
मोट बांधतील 
उरल्या सुरल्या आकांक्षांची,
करतील धडपड
कधीना कधी सुरळीत जगण्याची
या एकाच आशेवर
बसलय ते कुलुपबंद होऊन!!

सिरत सातपुते
२८ जुलै २०२०

Sunday, July 12, 2020

चराचराचा उत्सव

चराचराचा उत्सव

आला वसंत घेऊन
नवी आशा मनात
पालवीत गात्र गात्र
सृजनाचे गीत गात

मोहरला आंबा, वड
कूजन पक्षांचे ऐकत
वृक्षवल्ली देती साथ
नवलाईचे उधळीत रंग.

वैशाख वणवा पेटला
जीवाची ती तगमग
शोधी सावलीचा आसरा 
अन् झुळूक सहारा.

रखरख दाटे जगी
आणि मनात कोरड
राप भाजणी, शाकारणी,
आगोटाची लगबग.

काडीकाडी जमवत
पाखराचं नवं घर
गर्क सर्व जगण्यात
आणि घरट्यात नवा जीव.

आला पाऊस पाऊस
झाडं न्हातीधुती झाली
शेंड्यावरल्या घरात
पिलं कुशीत हो शिरली.

भरवला चोचचारा
बळ पंखात भरले
घरट्यातून उडण्याचे
अलविदा क्षण आले.

सृष्टी पुकारे चोहून
टाक पाऊल बाहेर
पाऊस दावे रुद्ररुप
पडेल घरटं मोडून.

दुरून दुस-या झाडावर
पुकारती मायबाप
पाखराची धडपड
पंखात उसने बळ.

उड उड रे पाखरा
घेऊन नवोन्मेष
कर मृग हा साजरा
चराचराचा उत्सव!!!!

सिरत सातपुते
२५ जून २०१८


Thursday, July 2, 2020

सलाम, मुंबईकरा सलाम!




सलाम, मुंबईकरा सलाम!
सस्ती मौत मरणा-या मुंबईकरा सलाम!
अगतिक दरिद्री मुंबईकरा सलाम!
दररोज लाईफलाइनच्या गर्दीत घुसमटणा-या 
मुंबईकरा सलाम!
खड्ड्यातल्या रस्त्यात हाड मोडून घेणा-या 
मुंबईकरा सलाम!
सगळे कर निमूट भरणा-या 
मुकाट मुंबईकरा सलाम!
आर्थिक राजधानीनिवासी बिरुद मिरवणा-या 
मुंबईकरा सलाम!
बुलेट ट्रेनचे स्वागत करणा-या 
उदारमनाच्या मुंबईकरा सलाम!
मुर्दाड राजकारण्यांना परतपरत निवडून देणा-या 
मुंबईकरा सलाम!
कंबरभर पाण्यात तासनतास चालणा-या 
मुंबईकरा सलाम!
मुंबईचे स्पिरिट पिऊन पुन्हा सुळावर जायला तयार 
मुंबईकरा सलाम!
लोंबकळत, चेंगरत, घामेजत आयुष्य ढकलणा-या 
मुंबईकरा सलाम!
दरडीखाली, मॅनहोलमधे, ब्रीजवर, 
प्रत्येक ठिकाणी मरायला तयार मुंबईकरा सलाम!
सलाम मुंबईकरा, सलाम!
चाकरमान्या, तुझ्या सोशिकतेला सलाम!
रोजच कफन बांधून तयारीत जगणा-या 
मुंबईकरा, तुला मनापासून सलाम! सलाम!! सलाम!!!

सिरत सातपुते
३० सप्टेंबर २०१७

Monday, June 22, 2020

समर्पण

समर्पण

कोसळत्या पावसाच्या सरींसोबत
प्रियकराचा संदेश 
वाचत बसलेली ती
विसरुनच गेली 
त्या निरोप्याला
जो पाऊस होऊन 
गळून गेला 
निरोप देतादेता.

प्रितीच्या हिंदोळ्यावर झुलताना
भान हरपलेल्या तिने 
शोधलच नाही त्याला
नव्हताच तिला द्यायचा 
फेरनिरोप त्या यक्षाला
की नव्हती पाठवायची त्याला
ख्यालीखुशाली, खबरबात.

गुंग होती ती स्वप्नात
तिने लपेटलं होतं प्रेम 
सर्वांगाभोवती
निरोप्याने आणलेल्या
निरोपातलं.
अंतर्बाह्य ती चिंब
पावसात मग्न
प्रितीचे तुषार 
अंगावर झेलत.

दूर कुठेतरी मी तटस्थ
बघत उसासत होते
मेघदूताचं गळून संपणं
बघून हेलावत होते
आषाढस्य प्रथम दिवसे 
या समर्पणाची 
साक्षीदार होत होते.

सिरत सातपुते
२२ जून २०२०