Wednesday, March 8, 2023

मुक्कामपोस्टगोरेगाव

जागतिक महिला दिन

'#मुक्कामपोस्टगोरेगाव' ची सुरवातच करतेय जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमापासून. वर्ष २०१० आणि ठिकाण गोरेगाव रायगड. गोरेगावच्या विकासात महिलांचे योगदान असा विषय घेऊन प्रथमच गोरेगाव रायगड येथे महिला दिन साजरा करण्यात आला. सत्यशोधक महाराष्ट्र पत्रिकेची मालक मुद्रक प्रकाशक सिरत सातपुते आणि पत्रिकेचा संपादक तिचा सहचर विजय सातपुते हे दोघे नुकतेच पाच महिन्यांपूर्वी मुंबईतून गावाकडे परत आलेले. विजय मुळचा गोरेगावचाच. चळवळ, वाचन, लेखन करण्यासाठी स्वेच्छानिवृत्तीनंतर गावाकडे आलेला. गावाकडच्या मुलांना शिक्षणात आणि नोकरीत असलेला इंग्रजीचा गंड घालवण्यासाठी गावात क्लासेस चालू केलेली सिरत, गावातल्या विविध वयोगटांना इंग्रजी भाषेबद्दलच्या न्यूनगंडातून बाहेर काढण्यासाठी काहीना काही करत होती. गावाला आल्या आल्याच विजयला कोमसाप गोरेगावच्या अध्यक्षपदाची माळ घातली गेली आणि दोघेही आपापल्या कामात गढून गेले. सोबतीला विजयचे आजारपण होतेच.

दर महिन्याला सत्यशोधक महाराष्ट्र पत्रिकेचे अंक निघत होते. विजयच्या अध्यक्षतेखाली मराठी दिन वेगळा व महत्वाचा विषय घेऊन वैचारिक अंगाने साजरा झाला होता आणि सिरतला वेध लागले महिला दिन साजरा करण्याचे. गोरेगावच्या इतिहासात अशा प्रकारे महिलांसाठी खास काही तोपर्यंत साजरे झाले नव्हते (संक्रांतीचं हळदीकुंकू व्हायचं म्हणा). जवळच असलेल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाशी जोडलेल्या सिरतला हा महिला दिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितिचे प्रभाकर नाईक (नाईक तात्या) यांनी साथ दिली आणि मग 'गोरेगावाच्या विकासात महिलांचे योगदान' या विषयावर चर्चासत्र आणि असं योगदान दिलेल्या महिलांचा सत्कार असा कार्यक्रम करण्याचं ठरलं.

८ मार्चला असलेल्या जागतिक महिला दिनाबरोबरच १० मार्चला येणाऱ्या सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचंही औचित्य साधायचं ठरलं आणि सत्यशोधक महाराष्ट्र पत्रिका आणि महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती गोरेगाव रायगड शाखेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम करायचा घाट घातला गेला. प्रसिध्द साहित्यिक वामन मल्हार जोशी हे गोरेगावातीलच. त्यांच्या नावे असलेल्या वा. म. जोशी वाचनालयात ८ मार्च रोजी दुपारी ४ वाजता जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम करायचा ठरला.

कार्यक्रम तर ठरला. ठरवलेला कार्यक्रम तडीस नेणं तसं कठीण काम. पण नाईक तात्या आणि विजय यांच्या सोबतीने गावातील मान्यवरांच्या आणि ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या मदतीने गोरेगावातील विकासातील महिलांच्या योगदानाची माहिती मिळवली आणि चर्चासत्राला बऱ्यापैकी आकार यायला लागला. नाईक तात्यांनी महिलांच्या गटांबरोबर बोलून कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती असेल याची काळजी घेतली आणि म्हणून कार्यक्रम दुपारी ४ वाजता महिलांच्या सोयीने ठेवला.

तसं बघितलं तर शहरातील महिलांना तोपर्यंत महिला दिनाचं अप्रुप काही राहिलेलं नव्हतं. बऱ्यापैकी सगळीकडे असे कार्यक्रम होत होते. पण गोरेगावसारख्या गावात असा बिगरसांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठी करणे तसं धाडसाचंच होतं. त्यात गावात त्यावेळी असलेल्या एकमेव सभागृहात म्हणजेच  वाचनालयात होणाऱ्या कार्यक्रमांबाबत सांगण्यात आलं होत की निम्मं सभागृह जरी भरलं तरी कार्यक्रम यशस्वी होतो. म्हणजे निम्मं सभागृह तरी भरेल की नाही याचीही खात्री नसते. ग्रामस्थ फार काही फिरकत नाहीत आणि महिलांची उपस्थिती तर अगदी नगण्यच.

जरा धाकधूकीतच कार्यक्रम सुरू केला. सुरवातीची उपस्थिती अर्ध सभागृह भरेल एवढी होती. म्हणजे कार्यक्रम यशस्वी होईल असं वाटायला लागलं. नाईक तात्यांनी सूत्रसंचालन करायला सुरवात केली. कार्यक्रम पुढे सरकत गेला आणि हळूहळू सभागृह तुडुंब भरलं. तुमच्या या कार्यक्रमात आम्ही पुरुष आलो तर चालेल ना असं म्हणून आलेल्या पुरुषांनी सभागृहाबाहेर रस्त्यावर गर्दी केली आणि गोरेगावातील विकासातील महिलांच्या योगदानाला कार्यक्रम यशस्वी करुन गोरेगावातील महिला व पुरुषांनी मनापासून दाद दिली.

आज तेरा वर्ष झाली त्या कार्यक्रमाला. या कार्यक्रमानंतर गोरेगावात नेमाने महिला दिन साजरा व्हायला लागला. वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या विषयांवर साजरा होत राहिला. २०१५ला मुंबईला परत आले आणि माझ्यासाठी तरी गोरेगावचा महिला दिन हळूहळू विस्मृतीत जमा झाला. पण यंदाच्या महिलादिनानिमित्त व्हय मी सावित्रीबाई... चा प्रयोग कालच गोरेगावात पार पडला आणि एक वर्तुळ पूर्ण झाल्याचं समाधान वाटलं!!

२०१० साली महिलादिनाला सावित्रीबाईंना जोडल्यानंतर आलेले बरे वाईट अनुभव पुढे कधीतरी!! तोपर्यंत वाचत रहा, #मुक्कामपोस्टगोरेगाव

सिरत सातपुते
८ मार्च २०२३

#मुक्कामपोस्टगोरेगाव
#लेखणीतून

Thursday, April 14, 2022

तोशीस

खोलखोल कायमच गाडलेले डोळे आणि 
जमिन कोरतानाचा तो मातीभरला अंगठा
एवढीच काय ती तिची ओळख 

मनच नसलेलं ते फक्त एक धड
दिवसाउजेडात राबराब राबणारं आणि 
रात्रीच्या अंधारात चोळामोळा होणारं 

बंद दाराआड दबलेली अस्फुटता
आणि उशीवरची चार कढत आसवं
मालकीच्या दावेदाराच्या नकळतच 

दावणीला बांधलेलं अख्ख आयुष्य
संपतय भळाळत्या जखमेसहीत
'त्याला' कसलीही तोशीस न लागता 

आपल्याच सत्तेत स्वमग्न तो,
तयार ठेवतोय अजून तसेच
गाडलेले डोळे आणि कोरणारे अंगठे!!

सिरत सातपुते 
८ एप्रिल २०२२

जय सीताराम

हे रामा
आज ठिकठिकाणी होतोय
तुझ्या जन्माचा 
धूमधडाक्यात जागर 
तुझ्या मर्यादा पुरुषोत्तम रुपाचे
अन् रामराज्याचे दाखले देत
तुझ्या नावाचे फिरताहेत मेसेज
आणि तुझे उभे केलेत 
मोठमोठे होर्डिंग्ज
धनुष्याची प्रत्यंच्या ओढतानाचे 

सीतामाईला स्थानच नाही 
आताशा तुझ्यासोबत
विसरलेत सीतारामाचा उद्घोष 
आणि तुझा वनवासही
एरव्ही सहज रामराम घालणारे
आताशा ओळखताहेत 
परस्परांना हिंदू म्हणून 
तुझ्या नावावर बसवलीय 
त्यांनी जबरी दहशत 
जय श्रीरामचा घोष करत 

असहिष्णुता हा गुण 
तूही शिकला होतास कधीतरी 
असुरांच्या मर्दनात आणि 
पितृसत्तेच्या वहनात
शूर्पणखेला तूच विद्रुप करवलस
आणि लंकेचं गणराज्यही 
खालसा केलस 
सीतेच्या आड राहून
आणि मग वापरुन तिलाच
सहज टाकून दिलस 

ते टाकलेपण वाहतेय
अजूनही सीता स्वतःबरोबर
तिच्या जन्ममृत्यूचा 
नाही होत सोहोळा
पण हे रामा,
आजही
आम्हाला होते तिचीच आठव
तिच्याच बरोबरीने घेतो तुझे नाव
कारण तूझं एकटं असणं 
जास्त धोकादायक
मागे कधीतरी रामनाम सत्य केलं
रघुपती राघव राजाराम म्हणणाऱ्याचे
तोही हे राम म्हणत निघून गेला
आणि हे रामा 
तेव्हापासून सुरूच आहे
तुझा नामाचा वापर करणं 
तुझ्याही नकळत!! 

सिरत सातपुते
१० एप्रिल २०२२
रामनवमी

Friday, August 28, 2020

प्रकाशबेटं

प्रकाशबेटं

या बाया कुठूनकुठून आलेल्या?
बायांचं हे चाललेय काय?
प्रश्न पडू लागलेत आता 
अनेकांना!!
देताहेत त्या नारा
निर्भय बनो चा
शाहिन बागेत दटून बसुन.
पुण्यातही बसल्या होत्या
रातच्या पारी, आणि
नागपाड्यातही.
जामियात, जेएनयुत पण
भळाळत्या जखमांसह 
ठाम उभ्या ठाकल्यात.
हे पाणी काही वेगळंच आहे,
व्यवस्थेची अस्पष्ट कुजबुज 
आणि दबकते इशारे.
दमनकारी यंत्रणा आणि 
सत्तेचा माज
नाही हलवू शकत 
तसुभरही या बायांना.
नाही शिरु देत या बाया
त्यांच्या विश्वात सहजासहजी
अनाहुतांना…
पण वेळ आली की
गांजलेल्या, पिचलेल्या या बाया
पेटून उठतात एका रात्रीत,
धाव घेतात आरेच्या जंगलात
आणि गेटवे ऑफ इंडियाला.
भेटतात या नजीबच्या आईला
समजून घेतात रोहितला 
सोबत राहतात एकमेकींबरोबर
डुब आल्यावर हातात हात धरुन.
माहुलच्या घरांतून बाहेर पडून
रस्त्यावर मांडतात संसार
आणि उध्वस्त न होता
लढतात, सावरतात एकमेकींना.
नाही म्हणायला शिकतात 
या बाया बेडरपणे,
इथेच जिंकतात या बाया
युगानयुगाचा संघर्ष
एका लिंगसत्ताकाशी चाललेला.
या निरंतर लढ्यात
सामिल आहेत काही बाप्येही
समतेच्या वाटेवर भेटलेत 
त्यांनाही जोतिबा न् गांधीबाबा.
केवळ बाप्यांच्या साथीने 
नाही सरशी होत या बायांची 
तर जिंकण्याचा कैफच 
चढत नाही बायांना.
त्या करत राहतात त्यांचं काम
अव्याहतपणे 
कसलीच तमा न बाळगता.
यालाच घाबरते व्यवस्था
आणि सुरू होतो 
एक सुडाचा प्रवास
जो घेऊन डुबणार असतो 
त्या व्यवस्थेच्या वाहकाला.
बाया उभ्या राहतात परतपरत
राखेतल्या फिनिक्ससारख्या,
बुडताना सगळं सावरतात
आणि वसवतात पुन्हा सगळं.
बुडवणं हा व्यवस्थेचा स्थायीभाव
आणि निर्मिती ही बायांची हातोटी.
आज बाहेर पडल्यात बाया
देश वाचवायला, नवनिर्मितीला.
आता वळून नाही बघणार 
या बाया 
थांबणार नाहित, 
जुमानणार पण नाहित 
फतवे आणि आदेशांना.
एक एक चिंगारी पेटलेय 
या बायांच्या मनामनात
मशालीत बदलल्यात या बाया
मशाल होऊन कारवाँ निघालाय
पेटवायला नाही तर प्रकाशवाटा उजळायला, 
स्वत: प्रकाशबेटं बनून...

सिरत सातपुते
२९ जानेवारी २०२०

Friday, August 14, 2020

स्वातंत्र्य दिनाच्या सदिच्छा

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
कोणी द्यायच्या कोणाला?
सत्तांध सरकारने, लाचार जनतेला?
का बुजूर्ग कार्यकर्त्याने 
आशावादी संवेदनशील तरुणांना?

आपण सर्वच हा दिवस मनवतोय 
आपापल्यापरिने
कोणी मध्यरात्री, कोणी सकाळी सकाळी,
नाच गाणी लाउडस्पिकरची रेलचेल
वर्षातला आजचा हा दिवस
राष्ट्रीय सण म्हणे
साजरा करायलाच हवा
गुलामिच्या बेड्या आवळताहेत 
तरिही.

लोकशाहिच्या या नगरीत 
गुंड झुंड पुंडाच्या राज्यात
कसा करावा विरोध
कशा मागाव्यात मागण्या
अटकाव कसा सत्तेला?
परिणाम नोटिसा आणि अटक अटळ.

कालपर्यंत फासाखाली गुदमरवत होता 
बळीराजा स्वतःला,
आज मरू दिलीत सहजतेने 
अजाण बालकांना!!! 
स्वातंत्र्यदिन साजरा झालाय
सर्वत्र हर्षोल्हासात, 
मदमस्तित दहिहंडी आणि
भक्तीरसात चिंब भिजलाय 
कृष्णजन्मोत्सव.
टाहो फोडताहेत देवकी
तुरूंग भरताहेत 
निषेधाचा सूर दडपला जातोय 
स्वतंत्रतेच्या जयघोषात!!

आपलीच माणसे आपल्याला 
गुलाम करताना बघून 
सांगा कसा साजरा करू 
हा काळवंडलेला स्वातंत्र्यदिन?
सांगा कशा देऊ सदिच्छा स्वातंत्र्यदिनाच्या?

सिरत सातपुते
१५ ऑगस्ट २०१७

Wednesday, August 5, 2020

कहर

कहर

कहर झालाय 
करोनाचा अन् पावसाचा
कडेलोट झालाय 
महानगराचा!
सुस्तावलेत सगळे
घेऊन  
अफुची गोळी
बडवले गेलेत नगारे 
जोरजोरात
आणि ओवाळल्यात
आरत्याही
नकोच ते
विकासाचे स्वप्न
जागेपणीच 
मिळाला आहे 
सगळ्यांना मोक्ष
कालचं एक दृश्य 
भरल्या घरात 
पावसाचं पाणी
भांबावलेल्या बायका
त्यातलीच एक
डोळे मिटून 
धावा करणारी
मदतीला आलाय तो?
आला असेल नक्कीच 
वानवा नाहीच 
या शहरात त्याची
फक्त तो राहात नाही देवळात 
की नाही बांधली जात 
त्याची देवळं!
हा एक चालतोय 
कधीपासून
हातात बूट आणि 
डोळ्यात अश्रु घेऊन
कुलुपबंदीत 
खायची भ्रांत
जगण्याची कसरत
तोही निराश हतबल
येईल त्याच्यासाठीही 
कोणीतरी
देईल आधार 
जगण्यासाठी
आणि मग
टेकू घेऊन चालायला लागेल 
सामिल व्हायला 
त्या टोळीत
टाळ वाजवत
मूर्ख बनत आणि बनवत!!

सिरत सातपुते
६ ऑगस्ट २०२०

Tuesday, July 28, 2020

कुलुपबंद शहर

कुलुपबंद शहर

त्या कुलुपबंद शहराने
एक खोलवर उसासा टाकला
आणि परत एकदा ते
चिडिचुप्प गल्लीबोळात 
जाऊन बसलं.
मध्यंतरी चर्चा होती शहरात
रात्रीच्या बेधुंदीची
रंगणार होती रात्रीची जिंदगी
आणि चढणार होती शहराला 
नवी जवानी.
पण आजकाल कसा काय
शहरात ऐकू येतोय 
हमरस्त्यावरचा फक्त सायरन
शववाहिका की रुग्णवाहिका
हेही आताशा कळत नाही
कारण गल्लीतले कुत्रे
कधीच विसरलेत रडणं
आणि माणसं तर 
दबकलेलीच.
रिकामे हात आणि 
रिकाम्या शाळा
सृजनाच्या वाटाच बंद करुन 
भकाळी पोट आणि 
कोरड्या डोळ्यांनी
आला दिवस कसाबसा जगत
गपगार पडलेली माणसं.
शांत तटस्थ माझं शहर
बघतय बंदीवासातली 
ही पडझड 
आणि माणसं उठतील,
मोट बांधतील 
उरल्या सुरल्या आकांक्षांची,
करतील धडपड
कधीना कधी सुरळीत जगण्याची
या एकाच आशेवर
बसलय ते कुलुपबंद होऊन!!

सिरत सातपुते
२८ जुलै २०२०