माझा जीवलग सखा
सूर्यास्त मला नेहमीच खुणावत आलाय. जेव्हा जेव्हा जिथे कुठे सूर्यास्त बघायला मिळाला की मी भान हरपून सूर्यास्त बघत राहते. आजही तसच काहिसं झालं. नेहमीसारखी संध्याकाळी खिडक्या लावायला म्हणून गेले आणि आभाळात सूर्याबरोबरच ढगांचही दर्शन झालं. आजचा सूर्यास्त काहीसा वेगळा आहे असं मनात म्हणेपर्यंत तो अलविदा करायला लागला. आणि मी अनिमिष नजरेनं त्याच्याकडे बघतच राहिले. आभाळात ढगांच्या पखरणीत, घराकडे निघालेल्या पक्षांबरोबर न रेंगाळता हा झपाझप निघाला सुध्दा!! चटकन फोन हातात घेतला आणि पटापट फोटो काढले. मुंबईतल्या गर्दीत हिरवळ टिकून असलेल्या जोगेश्वरीतल्या माझ्या कॉलनीतल्या एका बिल्डींगमागे अस्ताला जाताना आजच्या या सूर्याने नकळत मला माझ्या बालपणात नेलं.
माझं बालपण पण जोगेश्वरीतच गेलंय. शाळेच्या सुट्टीच्या दिवशी माझी हमखास गच्चीवारी असायची. आमची इमारत आणि आजूबाजूच्या सर्वच इमारती दोन मजल्यांच्या असल्याने सूर्यास्त अगदी डोळा़भरुन पाहता यायचा, मधे कसलाच अडथळा नसायचा. ब-याच वेळेला मी एकटीच गच्चीवर काय करते याचं कुतुहल मैत्रिणींना असायचं. मी मात्र जमेल तेव्हा संध्याकाळ सूर्यास्त बघण्यातच घालवायचे.
कधीतरी घरातल्यांबरोबर जुहू चौपाटीला गेले की माझी अवस्था कधी एकदा सूर्यास्त होतोय अशी व्हायची. समुद्र, लाटा, पाणी, किनारा या कशाकशाचे भान राहायचे नाही आणि मी तो तांबडालाल गोळा क्षितीजापार जाताना बघतच राहायचे. कॉलेजला गेल्यावर दादर चौपाटीपण अशीच खुणावायची. या चौपाटीवर मावळतीला जाणा-या सूर्याच्या साक्षीनं जोडीदाराबरोबर सहजीवनाची स्वप्न देखील बघीतली. एकदा असंच चिपळूणला छात्रभारतीच्या अधिवेशनाला गेले होते, येताना आम्ही सर्वजण गणपतीपुळ्याला गेलो. नेमकं संध्याकाळी पोहोचलो किना-यावर तर तो गणपतीपुळ्याचा अथांग समुद्र तांबडंलाल सूर्यबिंब पोटात घेत होता. मुंबईच्या किना-यावरुन बघितलेला सूर्यास्त आणि या सूर्यास्तात जबर फरक होता. त्यानंतर कधी मुंबईत चौपाटीवर सूर्यास्त बघावासाच वाटला नाही.
नंतर ब-याच वर्षांनी मालवणच्या समुद्रातला सूर्य असाच भरतीच्या लाटांवर नर्तन करताना दिसला. नाथ पै सेवांगणचा शांत किनारा आणि भरतीच्या लाटांवर नाचत नाचत अस्ताला जाणारा सूर्य, मग ब्रम्हानंदी टाळी लागली तर काय नवल!!
गोव्यातला सूर्यास्त रोज एकाच जागेवरुन बघीतला तरी रोजच वेगवेगळा कसा दिसतो हे कोडे मला अजूनही सुटलेले नाही. आपल्याच तालात किना-यावरील मायावी जगापासून दूरदूर जाताना हा अस्ताला जाणारा सूर्य सतत सोबतीला असण्याचा आनंद आजही तितकाच उत्कटतेने मनात जागा आहे.
परवा माझी मैत्रीण मला म्हणालीपण आजकाल समुद खूपच आवडतोय वाटतं! मी हसले फक्त, तिला सांगायचं राहिलच की समुद्रापेक्षा तो सूर्यास्तच जास्त आवडतोय. दमणला तिच्या घरातून समुद्र दिसतो पण सूर्यास्त बघायला किनाराच गाठायला हवा.
हे सूर्यास्ताचं आणि माझं नातं मलाच आता उलगडायला लागलं आहे आणि म्हणूनच मध्यंतरी राजस्थानला गेले तर जैसलमेरला पोहोचता पोहोचता सूर्य अस्ताला जाता जाता रस्त्यावर आमच्या समोर उतरुन आलेला बघीतला आणि वेडच लागायचे बाकी राहिले. इतका सुंदर मावळतीचा सूर्य बघीतल्यावर साहजिकच वाळवंटातील सूर्यास्त बघायची ओढ लागली. मस्त जामानिमा करुन या माझ्या जीवलगाला वाळवंटात भेटायला उंटाच्या गाडीतून गेले तर हा पठ्ठा ढगांच्या आडून माझी मजा बघतोय. ठिम्म आलाच नाही बाहेर शेवटपर्यंत. आता फक्त त्याला भेटायला म्हणून परत वाळवंटात जावं लागणार तर!!
आयुष्याच्या ह्या टप्प्यावर माझा हा सखा मला भेटतच राहतोय वेगळ्यावेगळ्या जागी. मीहि मग झुगारून देते सगळी बंधनं आणि भेटते त्याला मनापासून. काहूर माजलेलं माझं मन शांतावतं त्याला भेटून. ही भेट अशीच चालू राहिल अव्याहत माझ्यापुरत्या सृष्टीच्या अंतापर्यंत हे निश्चित.
सिरत सातपुते
छान आहे
ReplyDelete