Thursday, May 21, 2020

निष्पर्ण बहावा, पोपट आणि सक्तीचा विजनवास

निष्पर्ण बहावा, पोपट आणि सक्तीचा विजनवास

आम्हा रिजन्सी वासियांचा सक्तीचा विजनवास सध्या चालू आहे. आम्ही सर्व घरात कडेकोट बंद आणि बाहेर निसर्ग आपल्याच धुंदीत मस्त. महिनाही झाला नाही रिजन्सीत रहायला आल्याला. मुंबईतील सरस्वती बाग सारख्या वाळवंटातील ओअॅसिसमधुन अचानक रिजन्सीसारख्या काँक्रीटच्या जंगलात रहायला आल्यावर मन थोडं खट्टु झालं होतं. खिडकीतून बाहेर बघीतल्यावर माणसं दिसत होती, घरं दिसत होती पण काहीतरी हरवल्यासारख सतत जाणवत होतं.

आणि आज सकाळी युरेका युरेका असं मला ते सापडलं. माझ्या बाल्कनीतून एक सुंदर बहावा दिसतोय हा शोध मला लागला सकाळी सकाळी. मग काय कॉफी पिता पिता बहावा नजरेसमोरुन हलूच देत नव्हता. गुंतलेच मी त्या सोनेरी सौंदर्यात. अनिमिष नजरेने ते सौंदर्य पीत असताना अचानक नजर झाडाच्या शेंड्याकडे गेली आणि थबकलेच मी! 

निष्पर्ण बहाव्यावर नुकताच फुलोरा आलाय. अजून झाडं फुलांनी बहरायचय. झाडाचा बहुतांश भाग हा निष्पर्ण उदास आहे. अशा त्या उदास टोकावर एक पोपट शांतपणे बसला होता. आजूबाजूच्या अशोकाच्या झाडांवर पोपटांचा लपंडाव रंगला होता. मधुनच साळुंक्यांची बडबड चालू होती. माणसांमध्ये राहण्याचा जन्मसिध्द हक्क असलेले कावळे आणि कबुतरं पोपट आणि साळुंक्यांना हुसकावं का या विचारात इथेतिथे उगाचच उडत होती. बहाव्याच्या घोसांवर झोका घ्यायला चिमण्यांची लगबग सुरू झाली होती आणि या सगळ्यांपासून दूर निष्पर्ण टोकावर एक पोपट ध्यानस्त बसला होता. हो, त्यालाच बघुन थबकले होते मी!! 

कधीतरी शाळेत शिकलेली कवितेची ओळ आठवली, शुकासारखे वैराग्य ज्याचे... आणि खरंचं वैराग्य काय असते हे त्या एकट्या बसलेल्या पोपटाकडे बघुन जाणवायला लागले. सकाळच्या पारी निसर्गातली मुक्त उधळण बघत बसलेली मी कुठेतरी दूरदूर जातेय असं वाटायला लागलं आणि मी फुलत्या बहाव्याच्या सौंदर्यातून, पक्षांच्या बागडण्यातून, नैसर्गिक आवाजांतून मुक्त व्हायला लागले. 

मन निरव शांतता अनुभवत होतं आणि अचानक सांगितिक कोलाहलाने माझी तंद्री भंगली आणि मी परत वास्तवात आले. समोरच्या इमारतीत मोठ्या आवाजात गाणं लागलं होतं आणि मला वास्तवाचं भान आलं. करोनाचं ग्रहण आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग असे सगळे विचार मनावर हावी व्हायला लागले आणि क्षणिक वैराग्यात अडकलेली मुक्त झाले मी अजून खूप काम बाकी आहे या भावनेतून. बहाव्याचं सौंदर्य परत खुणावायला लागलय आणि बाहेरच बोचरं वास्तवही टोचायला लागलय. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही असा शब्द त्या निष्पर्ण बहाव्यावरील वैरागी शुकाला देत परत कामाला लागण्यासाठी उठले.

सिरत सातपुते
४ एप्रिल २०२०

4 comments:

  1. बहावा भावला.👌

    ReplyDelete
  2. मस्त , असेच लिहत राहा...

    ReplyDelete
  3. असेच वाचत रहा, लिहतही रहा!!

    ReplyDelete
  4. वास्तव खूप छान मांडलयस

    ReplyDelete